चार मतदार संघातील उमेदवारही जवळपास निश्चित
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चिती संदर्भात महाविकास आघाडी अंतर्गंत जागा वाटपाचा अंतीम निर्णय अद्याप व्हायचा आहे. तथापि, जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ जागांपैकी सहा जागांवर रा.काँ.(शरद पवार गट)ने दावा सांगितलेला आहे. एवढंच नव्हे तर सहापैकी चार जागांवरील उमेदवारही निश्चित असल्यासारखे आहेत.
विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी आता प्रत्येक जिल्ह्यात सुरु झाली आहे. पितृपक्ष आटोपल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान होतील. मात्र, तत्पूर्वी रा.काँ.तर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांशी तसेच निवडून येण्याची क्षमता किंवा तुल्यबळ व्यक्ती म्हणून काही नावांची पक्षांतर्गंत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. रा.काँ.मध्ये जे पूर्वीपासून आहेत आणि पक्षातर्फे निवडणुका लढविल्या आहेत. तसेच पक्ष फुटीनंतर जे शरद पवारांबरोबर कायम राहिले. त्यांचा प्रामुख्याने विचार केला गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात प्रामुख्याने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर, पारोळा-एरंडोलमधून माजी मंत्री डॉ.सतीष पाटील, मुक्ताईनगरमधून रा.काँ.(शरद पवार गट)च्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणीताई खडसे तर आपल्या राजकीय जीवनाची सुरवात भाजपमधून केलेले आणि अलिकडेच भाजपाला रामराम करत रा.काँ.मध्ये प्रवेश केलेले जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांची जामनेरमधून उमेदवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जामनेरमधील पक्षाच्या जाहीर सभेतच काही दिवसांपूर्वी केली. उर्वरित दोन जागांबाबत मात्र कोणतीही निश्चिती दिसून येत नाही. त्यात अनुक्रमे चाळीसगाव आणि भुसावळ मतदार संघाबाबतीत आहे.
उध्दव सेनेची भूमिका महत्त्वाची
मविआ अंतर्गंत रा.काँ.ने सहा जागांवर दावा केलेला असला तरी जळगाव ग्रामीण आणि चाळीसगाव मतदारसंघ उद्धव सेनेला हवा आहे. त्यातही जळगाव ग्रामीणच्या जागेसाठी स्वत: उध्दव ठाकरे कमालीचे आग्रही दिसून येत आहेत. तर लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधून उध्दव सेनेत दाखल झालेले माजी खासदार उन्मेश पाटील यांना चाळीसगावमधून उमेदवारी देण्याचा उध्दव सेनेचा इरादा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चाळीसगाव आणि जळगाव ग्रामीणचा तिढा कसा सोडविला जाईल, हा प्रश्नच आहे.
मी मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या…
रा.काँ. (शरद पवार गट) मध्ये नुकताच प्रवेश केलेले भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर दै. ‘साईमत’शी बोलतांना म्हणाले की, मी विधानसभेच्या जामनेर मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेटी देत आहे. भेटीगाठीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.