साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई तसेच अमळनेरातील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुक्मिणीताई कला, वाणिज्य महिला महाविद्यालय येथे विजय पाटील, अनिकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेत संशोधन पेपर व संशोधक प्राध्यापकांनी आवडीने नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपले वैचारिक, बौद्धिक, समीक्षात्मक विचार लेखांमधून नमूद केले. कार्यशाळेचे उद्घाटन अमळनेर शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरडाणा कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीणसिंग गिरासे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व संशोधन पत्र सादर करणाऱ्या प्राध्यापक, प्राध्यापिका यांना महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासाठी चंद्राई फाउंडेशन, धुळे यांचे सर्वेसर्वा नरेंद्र सोनवणे आणि प्रा. ममता सोनवणे तसेच त्यांचे सुपुत्र या सर्वांनी आर्थिक योगदान दिले. यावेळी संस्थेचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर प्रा.शाम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जे.शेख, महाविद्यालयातील समन्वयक डॉ.मनीषा खरोळे, नवलनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ.यु. वाय. गांगुर्डे उपस्थित होते. सुरुवातीला स्वागत गीत, ईशस्तवन सादर करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
परिषदेत अमळनेरला फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी आपले विचार मांडले. त्यांनी संशोधन कार्यशाळा आणि परिषदेबद्दल समाधान व्यक्त करून अमळनेरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे औपचारिक, स्नेहपूर्ण निमंत्रण सर्वांना दिले.
यावेळी चंद्राई फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, शाम पवार, प्रा.डॉ. यु.वाय. गांगुर्डे, प्रा. डॉ. ढाके यांनीही मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकार दिनाचे औचित्य साधून उमेश काटे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी विजय नवल पाटील, कै.नवलभाऊ, कै. रुक्मिणीताई यांच्या जीवनातील आत्मचरित्रपर पटकथा सर्व मान्यवरांसमोर मांडून त्यांची आणि संस्थेतील संस्थाचालकांची भारतीय राजकारणात कशा पद्धतीने वाटचाल व त्याग केला त्याचे मूर्तीमंत उदाहरण मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आणि प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.एस जे.शेख यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला.
प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी राष्ट्रीय परिषद शैक्षणिक धोरणावर विचार मांडत असताना शैक्षणिक धोरण २०२० हे कौशल्य आपल्या क्षमता, जबाबदारी व शिक्षक या विचार पुरुषाला खऱ्या अर्थाने सावध होऊन भविष्याच्या वाटा प्रकाशमय करण्यासाठी व भविष्यातील आपल्या क्षमता वाढवून विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण कसे देता येईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर पेपर रीडिंग सेशनमध्ये जवळपास ३० ते ३५ प्राध्यापकांनी पेपर प्रेझेंट केले. परिषदेसाठी जालन्याहून आलेल्या प्राध्यापकांनी पेपर प्रेझेंटेशन करण्यात केले. मध्य प्रदेश बडवाणी येथून आलेले विजय पाटील, जम्मू-काश्मीर, राजस्थान येथून असलेला संशोधन पेपर परिषदेमध्ये प्रस्तुत करण्यात आले. पेपर रीडिंग सेशनचे अध्यक्षस्थान एस.एस. व्ही.पी.एस.महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.स्वाती बोरसे यांनी भूषविले. प्रा. डॉ.दीपक पाटील यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा.डॉ. रूपाली पाटील, धुळे यांनी निवेदकाची भूमिका पार पाडत परिषदेचे कामकाज पाहिले.
शेवटी व्हॅलिडीटीक्टरी सेशन घेण्यात आले. या सेशनमध्ये निवडक प्राध्यापकांनी परिषदेवर आपले विचार व व्यवस्था नियोजनावर आपली कौतुकाने स्तुती सुमने उधळली. त्यानंतर सर्व उपस्थित प्राध्यापकांना प्रमाणपत्र महात्मा फुले पुरस्कार पुरुष प्राध्यापकांसाठी तर सावित्रीबाई फुले पुरस्कार महिला प्राध्यापकांना देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. यशस्वीतेसाठी प्रा.प्रमोद पाटील, प्रियंका पाटील रायबा बहुउद्देशीय संस्था, धुळे, प्रा.डॉ.यु.वाय. गांगुर्डे नवलनगर महाविद्यालय यांनी परिश्रम घेतले. आभार डॉ. मनीषा खरोळे यांनी मानले.