साईमत, यावल : प्रतिनिधी
अयोध्या येथे येत्या सोमवारी, २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशासह, राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यात ९० टक्के ठिकठिकाणी भगव्या झेंड्यांनी, पताक्यांनी सजावट केली आहे. ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सजावटीचे काम सुरू आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात नशिराबाद टोल नाक्याजवळ एकही आणि परिसरात एकही भगवा झेंडा किंवा पताका लावलेला आढळून आला नाही. त्यामुळे टोल नाका कॉन्ट्रॅक्टरला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) विभागाला तथा अधिकाऱ्यांना ‘भगव्या झेंड्याची’ ॲलर्जी आहे का..? त्याचा खुलासा जळगाव जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांनी करायला पाहिजे, असे सर्व स्तरातून चर्चिले जात आहे.
अयोध्या येथे सोमवारी, २२ जानेवारीला श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आणि देशात विविध मंदिरांमध्ये सार्वजनिक, व्यावसायिक, खासगी, औद्योगिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रोषणाई, भगवे झेंडे, पताका आणि श्रीरामाची आकर्षक मूर्ती असलेले बॅनर छायाचित्र लावले गेले आहेत. परंतु शनिवारी, २० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास जळगावकडून यावलकडे येत असताना नशिराबाद टोल नाक्याजवळ भगव्या झेंड्याची एकही पताका बॅनर झेंडा लावलेला दिसून आला नाही. त्यामुळे टोल नाका कॉन्ट्रॅक्टरला भगव्या झेंड्याची ॲलर्जी आहे का..? आणि अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना होणार असल्याने टोल नाक्यावर भगव्या पताका, झेंडे कॉन्ट्रॅक्टरने का लावले नाहीत..? जळगाव जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रादेशिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सूचना दिलेल्या नाहीत का..? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकप्रतिनिधींनी याबाबत जनतेच्या माहितीसाठी २४ तासाच्या आत खुलासा करावा, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.