साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील हिवरखेडा रस्त्यावरील गोविंद महाराज संस्थानच्या क्रीडांगणावर भारतातील सर्वांत मोठी कुस्तीची दंगल रविवारी, ११ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. कुस्त्यांच्या दंगलीला दुपारी एक वाजता सुरूवात होणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत दंगली रंगणार आहेत. जामनेरमध्ये देशातील अव्वल पैलवान येऊन ताकद आजमावणार आहेत. मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून जामनेर तालुकावासियांना कुस्त्यांची भव्य दिव्य दंगली पहावयास मिळणार आहेत. देशाच्या कान्या-कोपऱ्यातून अव्वल दर्जाचे आंतरराष्ट्रीय पहेलवान शहरात दाखल झाले आहेत.
कुस्त्यांच्या दंगलसाठी हिवरखेडा रस्त्यावरील क्रीडांगण सज्ज झाले आहे. दंगल स्थळी प्रेक्षकांना बसून कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी आसनाची व्यवस्था केली आहे. भाजपच्यावतीने ‘नमो कुस्ती महाकुंभ’ असे नाव स्पर्धेला दिले आहे. तालुक्यांसह महाराष्ट्रातील युवक वर्गाने त्याचा आनंद घेण्यासह व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.