खा.स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाना यश
साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील डांगर बु.गावाला अखेर ‘उदयनगर’ नावाची अधिकृत ओळख मिळाली आहे. केंद्र शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर महाराष्ट्र शासनाने २७ मे २०२५ रोजी राजपत्रात ‘उदयनगर’ नाव जाहीर केले आहे. त्यामुळे गावाच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून खा.स्मिताताई वाघ यांनी सातत्याने पाठपुरावा करत ही प्रक्रिया पूर्णत्वास नेली. नामांतर ही केवळ औपचारिक बाब नाही. तर ती ग्रामस्थांच्या भावना, अस्मिता आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरली आहे.दिल्लीतील गृह विभागाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने या निर्णयाला अंतिम स्वरूप दिले. गावाच्या नामांतराची बातमी समजताच गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी फटाके, मिठाई, पुष्पगुच्छ, ढोल-ताशांच्या गजरात खा.वाघ यांचे स्वागत केले.
याप्रसंगी खा. स्मिताताई वाघ म्हणाल्या, हे केवळ नाव बदलण्याचे नव्हे तर गावाच्या ओळखीला नवा अर्थ देणारे पाऊल आहे. ‘उदयनगर’ ही संज्ञा गावाच्या विकास आणि वैभवाचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘उदयनगर’ हे नाव भविष्यात प्रगतीशीलतेचे प्रतीक ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.