महिला ओबीसी आरक्षण जाहीर
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून जळगाव महानगरपालिकेसाठी महिला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण निश्चित झाले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या निर्णयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात महापौरपदाबाबत उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे.
जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महापौरपदावर भाजपचाच दावा मजबूत मानला जात आहे. मात्र, महिला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण निघाल्यामुळे आता भाजप कोणत्या महिला नेतृत्त्वाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “लाडक्या बहिणींपैकी” कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजपकडून महापौरपदासाठी उज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, गायत्री राणे, माधुरी बारी, विद्या सोनवणे अशी संभाव्य नावे पुढे येत आहेत. या सर्वच महिला नगरसेविकांनी पक्षसंघटनेत आणि महापालिकेतील कामकाजात सक्रिय भूमिका बजावली असून, त्यांच्या नावांचा गांभीर्याने विचार केला जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, माजी महापौर तथा पुन्हा निवडून आलेल्या जयश्री सुनील महाजन यांचे नावही चर्चेत आहे. त्या अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला असल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवा रंग भरला आहे. महापौरपदाच्या कार्यकाळातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भाजप नेतृत्व त्यांच्या नावाचा विचार करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
एकूणच महिला ओबीसी आरक्षणामुळे जळगाव महापालिकेतील महापौरपदाची लढत अधिक रंजक झाली असून, भाजपकडून अंतिम उमेदवार कोण ठरणार, याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत जळगावच्या राजकारणात चर्चांचा धुरळा कायम राहणार, हे मात्र नक्की.
