बहरलेल्या शेतीत मला भवरलाल जैन व ना. धों. महानोर दिसतात – शरद पवार

0
18

साईमत मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मी वेगवेगळ्या भागात गाडीने फिरत असतो आणि आजूबाजूची बहरलेली शेती बघतो तेव्हा मला त्या हिरव्यागार बहरलेल्या शेताकडे बघताना भवरलाल जैन व ना. धों. महानोर या माझ्या दोन मित्रांची आठवण येते असे वक्तव्य महानोर यांच्या श्रद्धांजलीपर आयोजित कार्यक्रमात निवेदक शंभू पाटील यांनी विचारलेल्या, तुमचे प्रिय मित्र भवरलाल जैन व ना. धों. महानोर नसताना आपण याकडे कसे पाहतात, प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी सांगीतले.

यशवंतराव चव्हाण सेंटर , भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमान मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महानोर यांना गीते आणि कवितांतून श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या “हा कंठ दाटूनी आला” या स्वरांजली कार्यक्रमात खासदार शरद पवार हे अध्यक्षस्थानी होते.
आपल्या मनोगत बोलताना शरद पवार यांनी ना. धों. महानोर यांच्यासोबतच्या आठवणी तसेच सहा दशकांच्या आपल्या ऋणानुबंधाची आठवण नमूद केली. याप्रसंगी त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने महाराष्ट्राच्या सहा विभागांमधील कवींना ना. धों. महानोर यांच्या नावाने दरवर्षी 50 हजार रुपये रकमेचा पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा सुद्धा केली. तसेच दरवर्षी 16 सप्टेंबर या महानोर यांच्या जन्मदिनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुंबई मध्ये मोठा सांगितिक कार्यक्रम घेण्याचं त्यांनी जाहीर केलं. याप्रसंगी मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल , अभिनेते सयाजी शिंदे , जितेंद्र जोशी, अजित भुरे , जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ , अभिनेते मंगेश सातपुते आणि हर्षल पाटील यांनी कविता सादर केल्या. याप्रसंगी कार्यक्रमाची भूमिका आणि प्रास्ताविक खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली तसेच महानोर कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय यांच्याशी असलेला सहा दशकांचा ऋणानुबंध विशद केला. या कार्यक्रमात महानोर यांची गाणी व आठवणी सर्वच मान्यवरांनी उलगडून सांगितल्या. महानोर नावाचा कवी हा मराठीतला सर्वश्रेष्ठ कवी असून त्यांच्या साहित्याची भूमिका , वेगवेगळ्या आठवणींच्या रूपातून सांगीतिक पद्धतीने परिवर्तनाच्या कलावंतांनी सादर केल्या. या कार्यक्रमात श्रद्धा पुराणीक कुलकर्णी, ऐश्वर्या परदेशी , अक्षय गजभिये यांनी गाणी सादर केली. तसेच रंगकर्मी शंभू पाटील यांनी ना. धों. महानोर यांच्या साहित्यातील तसेच शेती विषयक कामातून महानोर यांच्या अनेक गोष्टी रसिकांसमोर मांडल्या . याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी त्यांना आवडणाऱ्या दोन कविता सादर केल्या. याप्रसंगी महानोर कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची होती तर साथसंगत भूषण गुरव, संजय सोनवणे आणि रोहित बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या निर्मितीमध्ये सोनाली पाटील, अक्षय नेहे, अजय पाटील, कृष्णा पाटील यांचा सहभाग होता. कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचे दत्ता बाळसराफ व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहाय्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here