दोघे ताब्यात, चौघे फरार; जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही तरुणांनी रविवारी, ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता नाट्यगृहात मद्यासह मांसाहाराची पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची माहिती मिळताच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ छापा टाकला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित चार जण घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बालगंधर्व नाट्यगृहात मद्यासह मांसाहार शिजवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्याची तक्रार मिळताच महानगरपालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले आणि बांधकाम अभियंता आर.टी. पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी पोलिसांनाही माहिती मिळाल्याने डायल ११२च्या पथकासह जिल्हापेठ पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलीस पाहणी करत असताना पार्टी करणाऱ्यांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर चार जण पसार झाले आहेत.
मनपाच्या बांधकाम विभागाची पोलिसात तक्रार
बालगंधर्व नाट्यगृहाच्या मागील बाजूला मोकाट गुरांच्या कोंडवाड्याचा दरवाजा उघडा असल्यामुळे आरोपी आत शिरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि मांस शिजविण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी करत असून फरार चार जणांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.