साईमत, नवापूर : प्रतिनिधी
अंध अपंगांच्या मदतीसाठी राज्यभरातील अंध कलाकारांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन अंध अपंग प्रगती सोसायटीतर्फे केले आहे. शनिवारी, १६ रोजी सायंकाळी ६ ते ९ दरम्यान शहरातील सु. हि.नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सयाबाई नाईक सभागृहात चेतना मेलडी ऑर्केस्ट्रा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजकांतर्फे शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्र परिषदेला संस्थेचे तात्या पानपाटील, रावसाहेब कांबळे उपस्थित होते.
राज्यातील विविध भागातून १५ अंध व गुणी नामवंत कलावंत या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. बेरोजगार व अंध अपंगांच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक तात्या पानपाटील यांनी दिली.
राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह विविध भागातून १५ अंध कलावंत हा संगीतमय कार्यक्रमात नवीन, जुनी हिंदी, मराठी गाणी, भावगीते, देशभक्तिपर गीतांसह मिमिक्री सादरीकरण करणार आहेत. शहरातील विविध संस्था, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक अशा सर्व क्षेत्रातून मदतीच्या हात मिळत असल्याचे पानपाटील यांनी सांगितले. अंध कलावंतांचा उत्साह वाढविण्यासाठी संगीतमय कार्यक्रमास नवापूरकर नागरिकांनी मदतीचा हात द्यावा, असे आव्हान आयोजकांतर्फे केले आहे.