साठीच्या कलावंतांची संगीतसाधना

0
18

साईमत, त्र्यंबकेश्‍वर: प्रतिनिधी
संगीत शिक्षणाचा गंध नव्हता, पण गायी चारताना बासरीतून गवसलेल्या सुरामुळे सावरपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे कलावंत घडले.
इथल्या सनई-संबळ वाद्याला जिल्हाभरातून मागणी असते. शेतातील कामे झाली, की कलावंत पाड्यावरील मंदिरात एकत्र येतात. आता त्यांचा समूह तयार झाला आहे. त्यांचे सनई-संबळ लग्नसराईत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेले असते. रामदास राऊत, गणपत राऊत, गोविंद राऊत, गोपाल बोरसे हे संबळ वाजवतात. लवसू राऊत हे काडीचे गाणे सादर करतात. धर्मा राऊत ढोलकीवादन करतात. हे सर्व कलावंत साठी पार केलेले आहेत.लहानपणी जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्यावर बांबूपासून बासरी बनवत विविध गाणी वाजवत असत. त्यातून आवड वाढून त्यांना सूर सापडले आहेत. बोहाडामध्ये हे कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करतात. देवधर्म, गवळण, चित्रपट गीते सादर करतात. दिवसभर न थकता त्यांचे वादन चालते. मुंबईतील कार्यक्रमांसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कलेचे कौतुक केले होते. डीजेच्या दणदणाटातसुद्धा सनई-संबळचे आदिवासी पाड्यावरील कलावंतांनी आपले स्थान अबाधित राखले आहे. वाढत्या वयामुळे सरकारने मानधनासाठी आमचा विचार करावा, अशी त्या कलावंतांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here