अनोख्या पद्धतीने ‘दिवाळी पहाट पाडवा’ साजरा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मुक्ताई कॉलनीत आधार ज्येष्ठ नागरिक संघात ‘दिवाळी पाडवा’ निमित्त ‘दिवाळी पहाट’ सुमधुर गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम गायिका सुनंदा चौधरी यांच्या मधुर स्वरांनी सजलेला आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला डॉ. संभाजी देसाई, जुलाल पाटील, अमृत पाटील, उदय बापू पाटील, गजानन देशमुख, सचिव प्रकाश पाटील, रत्नमाला देसाई, प्रतिभा देशमुख आदी उपस्थित होते. सुरुवातीला सुनंदा चौधरी, निकिता जोशी, प्रशांत ठाकूर, मयूर मोरे, योगेश पाटील तसेच टीव्ही मालिकेतील (“विन दोघातली ही तुटे ना”) अभिनेत्री मीनाक्षी सुधीर निंबाळकर यांचा अध्यक्षांच्या हस्ते रुमाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संघाचे अध्यक्ष डॉ. संभाजी देसाई यांनी उपक्रमाचे महत्त्व सांगत, ज्येष्ठांचे मनोरंजन आणि दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले. सुनंदा चौधरी यांनी कार्यक्रमात ‘एक राधा एक मीरा’, ‘या जन्मावर’, ‘आभाळागत माया तुझी’, ‘आली माझ्या घरी दिवाळी’, तसेच देशभक्तीपर गीतांची मेजवानी सादर करून दोन तास प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्ष उदय बापू पाटील यांच्या हस्ते प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला दिवाळी अंक भेट देण्यात आला. यावेळी रमेश बोरसे, अलका पाटील, बळवंत चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह सदस्य उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी डॉ. भागवत निंबाळकर, संतोष गावंडे, पंढरीनाथ साळुंखे, शेखर पाटील, नामदेव पाटील, विजय देसाई, डी.डी. पाटील, विजय चव्हाण, अलका मगरे आदींनी परिश्रम घेतले. शेवटी सचिव प्रकाश पाटील यांनी आभार मानले.



