वरणगाव फॅक्टरीतील कर्मचाऱ्याचा खून

0
46

कौटुंबिक वादातून खून झाल्याचा संशय, दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :

वरणगाव फॅक्टरीच्या क्वार्टर थ्री टाईप ४४ मध्ये एका कर्मचाऱ्याचा निर्घूणपणे खून केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. खूनाच्या घटनेचे रहस्य गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने फॅक्टरीच्या वसाहतीत खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर पदावर कार्यरत प्रदीप जयसिंग इंगळे (वय ४४) बुधवारी दुपारी लंच टाईमच्या वेळेला त्यांचे कर्मचारी निवासस्थान असलेल्या थ्री टाईप ४४ मध्ये जेवणासाठी घरी आले होते. मात्र, दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज शेजारील रहीवाशांना आल्याने त्यांनी काही वेळाने जावून पाहिले असता प्रदीप इंगळे मृतावस्थेत आढळून आले. याबाबत फॅक्टरीच्या सुरक्षा विभाग तसेच वरणगाव पोलीस ठाण्यात माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, सुशील सोनवणे, पो.हे.कॉ. संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तीन संशयितांना तातडीने ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मयताचा सख्खा भाऊ असल्याचेही सांगण्यात आले. या घटनेबाबत पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांची भेट

घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार भुसावळ विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देवून सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना योग्य त्या तपासाच्या सूचना दिल्या. तसेच सायंकाळी उशिरा जळगाव येथील फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरील काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी ताब्यात घेतले.

घटनेला कौटुंबिक वादाची किनार

घटनेतील मयत हा नुकताच वरणगाव फॅक्टरीत काडतूस चोरी प्रकरणातील सतीश जयसिंग इंगळे यांचा लहान भाऊ होता. सतीष इंगळे हा मुक्ताईनगर येथून येथील स्टेट बँकेच्या काही कामानिमित्त आला होता. यावेळी बॅकेसमोरच असलेल्या तो आपल्या या लहान भावाच्या घरी आल्याने दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून काही वाद झाल्याची चर्चा आहे. मयत प्रदीप इंगळे यांची पत्नीही कौटुंबिक वादामुळे काही दिवसांपासून आपल्या माहेरी राहत असल्याची चर्चा आहे. खुनाच्या घटनेला कौटुंबिक वादाची किनार असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here