साईमत, जळगाव ः प्रतिनिधी
अतिक्रमण करून शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचवणारे, सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेत भरगच्च पगारावर कर्मचारी नियुक्त केले आहेत. पण दरमहा नियमित पगार घेऊन या पथकातील कर्मचारी काम न करता पत्त्यांचा डाव मांडत असतात. शहरातील महात्मा गांधी मार्केट समोर असलेल्या पार्किंगच्या शेड मध्ये हा डाव सुरू असतो. या संदर्भातील एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. महापालिका आयुक्तांपर्यंत तो पोहोचल्याची माहिती आहे.
हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांमुळे अतिक्रमण वाढून अनेक रस्त्यांचा जीव गुदमरत आहे. टॉवर चौक, कोर्ट ते गणेश कॉलनी, रेल्वे स्थानक, फुले मार्केट परिसर याशिवाय शहरात वेगवेगळया भागात जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यात अतिक्रमण करून व्यवसाय थाटले जात आहेत. तात्पुरत्या कारवाईनंतर ते पुन्हा सुरू होतात. अतिक्रमण पथकातील कर्मचारी जर असा पत्त्यांचा डाव रंगवत असतील तर कोण काम करणार आहे हा प्रश्न आहेच.