दोन आस्थापनांवर ५ हजारांचा दंड ; व्यापाऱ्यांना स्वच्छतेचे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील गोलाणी मार्केट परिसरात रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता महानगरपालिकेच्यावतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान सुमारे ८ ते १० टन कचरा संकलित केला आहे. अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन आस्थापनांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मनपाच्या स्वच्छता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुल असल्याने येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन केले होते. मोहिमेसाठी २५ ते ३० कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली होती तर कचरा उचलण्यासाठी १३ वाहने वापरण्यात आली. मोहिमेदरम्यान मार्केट परिसरातील जुना, साचलेला आणि दुर्गंधीयुक्त कचरा उचलण्यात आला, ज्यामुळे परिसरातील अस्वच्छतेची गंभीर समस्या अधोरेखित झाली.
कठोर दंडात्मक कारवाई करणार
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन आस्थापनांवर कारवाई करत प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापनांच्या परिसरात स्वच्छता राखावी आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांनी सांगितले. मनपाने व्यापाऱ्यांना परिसर अस्वच्छ ठेवल्यास किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये “स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव” हा संदेश देत मनपाने स्वच्छतेबाबत शिस्त व जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले आहे