साईमत प्रतिनिधी
मुंबईतील पवई परिसरात बुधवारी संध्याकाळी एक थरारक घटना घडली. अभिनय शिकवण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या एका स्टुडिओमधून तब्बल १७ अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आणि NSG (NSG operation Mumbai) कमांडोनी तत्परतेने कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली असून, या प्रकरणातील संशयित रोहित आर्य याला ताब्यात घेतले आहे.
पवईतील एका स्टुडिओत गेल्या पाच दिवसांपासून “अभिनय कार्यशाळा” (Acting Workshop) सुरू असल्याची माहिती होती. या क्लासमध्ये सहभागी झालेली १५ वर्षांखालील १७ मुले बुधवारी अचानक स्टुडिओमध्ये अडकली गेली. बाहेरील व्यक्तींना संपर्क होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली असता, रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने स्टुडिओमध्ये सर्व मुलांना ओलीस ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्याने स्वतःच्या “काही मागण्या” असल्याचे सांगत मुलांना इजा न करण्याची हमी दिली.
पोलिसांशी संवाद साधताना संशयित रोहित आर्य म्हणाला,
“मी दहशतवादी नाही. मला आत्महत्या करायची नव्हती म्हणून मी मुलांना बंदी बनवलं आहे. माझ्या काही मागण्या आहेत, मला सरकारशी बोलायचं आहे.”
प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे की, रोहित आर्य याचे काही आर्थिक व्यवहार बुडाले होते आणि त्याने त्यासाठी शासनाला जबाबदार धरले होते. या पार्श्वभूमीवर त्याने लक्ष वेधण्यासाठी हा अत्यंत धोकादायक मार्ग अवलंबला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी पवई परिसर तात्काळ सील करून NSG कमांडो आणि अग्निशमन दलाच्या पथकांना घटनास्थळी बोलावले. स्टुडिओभोवती तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जवळपास तीन तासांच्या चर्चेनंतर पोलिसांनी ऑपरेशन सुरू केले आणि सर्व १७ मुलांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले.
दरम्यान, संशयित रोहित आर्यकडे एअरगन आणि काही केमिकल पदार्थ आढळले. पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार करत त्याला निष्क्रिय केले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर मुंबईतील खासगी स्टुडिओ, ऑडिशन सेंटर आणि अभिनय वर्गांची सुरक्षा तपासण्याची मागणी सुरू झाली आहे. पालक व नागरिकांनी सोशल मीडियावरून “मुलांच्या सुरक्षेबाबत कठोर नियमावली बनवावी” अशी मागणी केली आहे.
मुंबई पोलिसांनी अपहरण, जीवितास धोका आणि बेकायदेशीर कैद या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, रोहित आर्यच्या पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे. त्याच्या मोबाईल आणि सोशल मीडियावरील संवादाचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.



