साईमत/ न्यूज नेटवर्क । मुक्ताईनगर ।
येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर मुक्ताईनगर शहरातील पिण्याच्या पाण्याचे तपासणीचे नमुने मुक्ताईनगर येथील भूजल सर्वेक्षण प्रयोगशाळेत पाठविले जात नाही. आता नगरपंचायत झाल्याने पिण्याचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात असलेल्या जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागात पाठविले जातात. महिन्याभरातून चार भागातील नमुने वेगवेगळे पाठविण्यात येतात. हे पाण्याचे नमुने चक्क मद्याच्या बाटलीमध्ये पाठविले जातात. बाटलीचे शुद्धीकरण केले जात असले तरी ह्या बाटलीमध्ये पाणी तपासण्याचे नमुने पाठवणे चुकीचेच आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. नव्याने उच्च प्रतीच्या दर्जा असलेल्या बाटल्या नगरपंचायतला वितरित कराव्या, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र भागातील पिण्याचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी भूजल सर्वेक्षण विभागात तपासणीसाठी मद्याच्या बाटलीत पाणी तपासणीसाठी नमुने घेऊन जात होते. याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी लक्ष देत जिल्हा परिषदेमार्फत पाणी नमुने गोळा करण्याकरीता उच्च प्रतीचा दर्जा असलेल्या बाटल्यांचे वितरण केले.
उच्च प्रतीच्या बाटल्यांचे वितरण
जिल्हा परिषदेमार्फत एप्रिल महिन्यात पाण्याचे नमुने घेण्यासाठी योग्य उच्च प्रतीच्या दर्जा असलेल्या बाटल्यांचे वितरण केलेले होते. (केजीएन) त्यात १ लिटरची बाटली रासायनिक तपासणीसाठी तीन हजार ३४१ तर २५० मिली लिटरची बाटली जैविक तपासणीसाठी सहा हजार ६८२ बाटली असे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रयोगशाळेत वितरीत केले होते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये त्यांना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
बाटल्यांचे १०४ डिग्रीत निर्जतुकीकरण
हा विषय वरिष्ठांकडे कळविण्यात आलेला आहे. जळगाव येथील भूजल सर्वेक्षण प्रयोग शाळेत तपासणीसाठी आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या १०४ डिग्रीत निर्जतुकीकरण केले जाते, असे जळगाव येथील पाणी तपासणी प्रयोगशाळेचे अधिकारी श्री.दोषी यांनी सांगितले.