आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश तीन तालुक्यांतील रस्ते सुधारणा आणि पुलाचे काम होणार
साईमत/ मुक्ताईनगर / प्रतिनिधी
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राज्याच्या ६ मार्च रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ विविध रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मतदारसंघातील रस्ते विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
मतदारसंघातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत सरकारने प्रस्तावित कामांना तत्काळ मंजुरी दिली आहे.
मंजूर झालेल्या निधीतून मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर या तीन तालुक्यांतील महत्त्वाच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा, खांडवी, कोथळी आणि पूर्णाड परिसरातील रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. बोदवड तालुक्यातील नायगाव, सावखेडा तसेच किन्ही-खंडाळा या मार्गांचे कामही हाती घेतले जाणार आहे. याशिवाय रावेर तालुक्यातील खिरोदा, पाल, मोरव्हाल आणि खिर्डी परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. मुक्ताईनगर शहरात गजानन महाराज मंदिराजवळ लहान पुलाचे बांधकामही या योजनेतून करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. आता निधी मंजूर झाल्याने मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे कार्यकर्ते व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
“मतदारसंघातील जनतेला दर्जेदार रस्ते मिळावेत ही माझी प्राथमिकता आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा घराघरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे मत आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
