साईमत मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) येत्या 21 डिसेंबरला प्रस्तावित असलेल्या दोन महत्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीच्या दिवशीच परीक्षा होणार असल्याने, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि शांततापूर्ण परीक्षागृह वातावरणाच्या दृष्टीने उद्भवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही मूळत: 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आयोजित करण्यात आली होती. पण राज्य निवडणूक आयोगाच्या 2 डिसेंबरच्या आदेशानुसार, याच दिवशी सर्व जिल्ह्यांत नगर परिषद व नगर पंचायती निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याने, परीक्षा आणि मतमोजणी एकाच वेळी घेणे अवघड होणार असल्याचे स्पष्ट झाले.
मतमोजणी केंद्रे आणि परीक्षा उपकेंद्रांतील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, वाहतूक कोंडी, तसेच परीक्षेच्या आयोजनासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता—या सर्व मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या अहवालानंतर आयोगाने परीक्षेच्या वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे नमूद केले. त्यामुळे नियोजित तारखेला परीक्षा घेणे शक्य नसल्याचे आयोगाने जाहीर केले.
यामुळे आयोगाने दोन्ही परीक्षांच्या सुधारित तारखा पुढीलप्रमाणे निश्चित केल्या आहेत—
-
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 – 04 जानेवारी 2026
-
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 – 11 जानेवारी 2026
आयोगाने सर्व उमेदवारांना सुधारित दिनांकांची आवश्यक नोंद घेण्याचे आवाहन केले असून, पुढील कार्यपद्धतीबाबत आवश्यक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
