दहशत माजविणाऱ्या सराईतावर ‘एमपीडीए’ची कारवाई
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरात दहशत माजविणाऱ्या आणि शरीराविरुद्ध तसेच मालाविरुद्ध १३ गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या सराईत गुन्हेगार समीर हनीफ काकर (वय २२, रा. तांबापुरा) याला अखेर एमपीडीए कायद्यान्वये पुणे येथील येरवाडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील समीर काकर हा कुख्यात गुन्हेगार आहे. तांबापुरा, मेहरुण व जळगाव परिसरात त्याची दहशत होती. नागरिकांना विनाकारण मारहाण, दरोडे, घरफोड्या, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत अशा १३ गंभीर गुन्ह्यांत तो गुंतलेला आहे. यापूर्वी त्याला जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, हद्दपारीनंतरही त्याने गुन्हेगारी सुरुच ठेवली होती. एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. तो मान्य करून ४ सप्टेंबर रोजी येरवाडा कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले.
पुण्यात राबविली शोधमोहीम
आदेश मिळाल्यानंतर तो फरार झाला होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुण्यात शोधमोहीम राबवून २५ सप्टेंबर रोजी समीरला ताब्यात घेतल्यानंतर त्याला येरवाडा कारागृहात दाखल केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.