साईमत जळगाव प्रतिनीधी
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाच्या वतीने बुधवारी २० सप्टेंबर रोजी आकाशवाणी चौकात निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.
याबात अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ बुधवारी २० सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पवार व महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकात निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १८/०९/२०२३ रोजी धनगर आरक्षणाच्या वादावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असतांना अजित दादा व पवार कुटुबियांबाबत गोपीचंद पडळकरांनी अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरली. आपली लायकी व क्षमता नसणारा हा गोपीचंद आपल्या भुमिकेशी कधीच एकनिष्ठ राहीला नाही. अजितदादांच्या विरोधात केवळ ३० हजार मते घेऊन डिपॉझीट जप्त झालेला या माणसाला अजितदादांनी १ लाख ६५ हजार मतांनी पराभूत केले. याची सल कुठेतरी मनात ठेवुन वेळ मिळेल तेव्हा पवार कुटुबियांवर अतिशय शेलकी टिका करणाऱ्या या माणसाला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी जरी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांच्यावर ठोस कारवाई झालीच पाहीजे अशी कार्यकर्त्याची मागणी आहे. अन्यथा पडळकरांना आहे तिथे जाऊन त्यांचा समाचार घेण्याचा मानस कार्यकर्त्यांचा आहे. असेही पत्रकात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार व महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, विनोद देशमुख,कल्पना पाटील, मीनल पाटील,अभिलाषा रोकडे,अरविंद चितोडीया, अरविंद मानकरी, मच्छींद्र साळुंके, किशोर पाटील, योगेश देसले, रविंद्र नाना पाटील,अशोक पाटील, वाय. एस. महाजन, पंकज बोरोले, रफिक पटेल, रमेश भोळे, जितेंद्र अरुण चांगरे, नदीम मलिक,लता मोरे, तुषार इंगळे, साहिल पटेल, कैसर काकर, सुनील शिंदे, चंद्रमणी सोनावणे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.