साईमत बोदवड प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षण मागणीच्या उपोषण करणाऱ्या मराठा समाजाचे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केल्याच्या निषेधार्थ सोमवारी ४ सप्टेंबर रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती पासुन मराठा समाजाचा मुक मोर्चा काढत मलकापूर चौफुलीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे आज राज्याच्या विविध भागांमध्ये संतप्त पडसाद उमटले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. जालना आणि धाराशिवमध्ये बंदला हिंसक वळण लागले. याला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या गृहमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, मराठा समाजातील आंदोलकांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावी. या मागणीसाठी बोदवड मराठा समाजाच्या वतीने सोमवारी ४ सप्टेंबर रोजी शहरातील मलकापूर चौफुलीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार मयुर कळसे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनास नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक, भोले महाकाल फाँटेशन, हिदु सुर्य महाराना प्रताप उत्सव समिती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी विविध संघटनानी पाठिंबा दिला. निवेदनावर शेकडो समाज बांधवांनसह आंदोलनाला पाठींबा देणारे विविध समाजातील नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.