भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनींवर तारण कर्ज मिळणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)-
राज्यातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनींवर तारण कर्ज मिळणार आहे. तसे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले असून लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हा निर्णय कोणत्याही एका बँकेपुरता मर्यादित नसून राज्यातील कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणं सोपं होणार आहे. यापूर्वी 1990 मध्ये भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनींबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनाही पीककर्ज, शेती विकासासाठी मध्यम, दीर्घ मुदतीचे कर्ज देता येणार आहे. कर्जासाठी शासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही.
शेतकऱ्यांना बँका कर्जपुरवठा करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज परतफेड करू शकला नाही. तर बँक अडचणीत येते. अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगावटादार वर्ग 2 असेल तरी त्यावर बोजा चढविता येत नाही असे बँकांचे म्हणणे होते. त्यामुळे भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या. शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते. आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयीकृत बँकांनाही या जमिनी तारण घेता येणार आहेत. याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी 11 मार्च रोजी भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीबाबत बैठक घेऊन हा प्रश्न महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय.
भोगवटा वर्ग दोनच्या जमिनींमध्ये देवस्थानासाठी दिलेल्या इमानी जमीनी, हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुनर्वसनाच्या जमिनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. अशा जमिनी विक्रीसाठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.