मुंबई :
मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या बीडच्या सभेत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून प्रहार केलेतेलगी प्रकरण, पहाटेचा शपथविधी ते दादांचे नेतृत्व यावरून भुजबळांनी फटकेबाजी करताना शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. संपूर्ण भाषणात भुजबळांनी पवारांना टार्गेट केले. आधीच लांबलेल्या भाषणाला उपस्थित कंटाळले होते. त्यात भुजबळ एकामागून एक पवारांवर वार करत राहिले. हाच धागा पकडून आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.पवारसाहेबांच्या विरोधात सूर निघाल्याने उपस्थित बीडकरांनी गोंधळ केला.त्यामुळे पुढच्या २ मिनिटांत त्यांना भाषण गुंडाळावे लागले, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
…सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची… अस्मितेची… सन्मानाची अन् दुष्काळ मिटवण्यासाठीची… अशी टॅगलाईन वापरून धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये जंगी सभेचे आयोजन केले होते. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सगळे मंत्रिगण उपस्थित होते. भव्यदिव्य रॅलीने अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत करण्यात आले.सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अभिवादन केले. जिल्ह्यातील आमदारांची भाषणे झाल्यावर प्रमुख नेत्यांनी भाषणे केली. यात भुजबळांनी पवार यांच्यावर बोचरे वार केले. त्यांच्या याच भाषणाविरोधात राष्ट्रवादीचा पवार गट आक्रमक झाला आहे. भुजबळांच्या भाषणाविरोधात आज पवार गटाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.