साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात दि.१७ ते २१ ऑक्टोबर या काळात पाच दिवसीय बिगर हिंदी नवलेखक शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर शिबिर हे भारत सरकार संचालित केंद्र केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्ली आणि मूळजी जेठा महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन दि.१७ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध हिंदी लेखक डॉ.महेंद्र ठाकूरदास यांच्या हस्ते करण्यात आले. यांनतर या पाच दिवसात, धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.योगेश पाटील यांनी निबंध लेखन, रेखाचित्र आणि संस्मरण या विषयावर उपस्थित शिबिरार्थी नवलेखकांना मार्गदर्शन केले. मू.जे.चे माजी हिंदी विभागप्रमुख प्रा.अरुण पाटील यांनी नाटक आणि एकांकिका यांच्या संहिता लेखन विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी दुसऱ्या भाषेतील पात्रांवर नाटक लिहितांना कुठल्यागोष्टींची खबरदारी घ्यावी, हे सांगितले. जळगावच्या हिंदी लेखिका डॉ. उषा शर्मा यांनी रेडियो आणि दूरदर्शन या माध्यमांमध्ये कसे लेखन करावे आणि काय सावधगिरी बाळगावी, यावर चर्चा केली. तसेच डॉ.महेंद्र ठाकूरदास यांनी लोकगीत आणि चित्रपट गीते यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. प्रा.विजय लोहार यांनी गझल : रचना तंत्र या विषयावर, त्यातील संवेदना, प्रतिमा, छंद विधान आणि गझलेचे विविध अंग यावर आपले विचार प्रकट केले. लेखक डॉ.पुरुषोत्तम पाटील यांनी तुलनात्मक साहित्य, अनुवाद कला आणि पत्रकारिता कला यावर मार्गदर्शन केले. तसेच मू.जे.तील डॉ.मनोज महाजन यांनी साहित्यातील सृजनशीलता, साहित्याची निर्मिती प्रक्रिया यावर नवलेखकांना मार्गदर्शन केले.
दि.२० ऑक्टोबर रोजी या शिबिरातील नवलेखक गांधी तीर्थ येथे जावून हिंदी भाषेच्या प्रचार -प्रसारचे कार्य बिगर हिंदी भाषिक असतांना महात्मा गांधी यांनी कसे केले हे समजून घेतले. दुपारी आयोजित केलेल्या बहुभाषिक काव्य संमेलनात मराठी, हिंदी, तमिल, सिंधी, बंगला भाषा आणि उडिया भाषेतील कविता सहभागी नवलेखकांनी सादर केल्यातया शिबिरात प.बंगाल, उडीसा, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रातून निवड झालेल्या एकूण २८ नवलेखकांनी आणि स्थानिक २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
नवलेखक शिबाराच्या समारोप सोहळ्यास निदेशालयाचे उप-निदेशक हुकूमचंद मीना, नवी दिल्ली आणि मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे यांच्या हस्ते सर्व नवलेखक सहभागींना भारत सरकार संचलित केंद्रीय हिंदी निदेशालयाचे सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या सोहळ्यास भाषा प्रशाळेचे संचालक डॉ.भूपेंद्र केसुर, डॉ.उषा शर्मा,डॉ.मनोज महाजन, प्रा.उज्वला पाटील उपस्थित होते. या शिबिराचे समन्वयक प्रा.विजय लोहार यांनी शिबाराचा आढावा सादर केला आणि आभार प्रकट केलेत.