राज ठाकरेंनी स्वत: ‘एबी’ फॉर्म दिला
साईमत/मुंबई/विशेष प्रतिनिधी :
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत मनसेचे ज्येष्ठ नेते यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म देऊन त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी स्वत: यशवंत किल्लेदार यांना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. किल्लेदार हे दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मधून निवडणूक लढवणार आहेत. २०१७ च्या निवडणुकीत हा वॉर्ड शिवसेनेच्या ताब्यात होता, मात्र आगामी निवडणुकीसाठी झालेल्या जागावाटपात हा भाग मनसेच्या वाट्याला आला आहे. एबी फॉर्म वाटपाच्या वेळी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित होते.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पक्षाने दिलेल्या या संधीमुळे यशवंत किल्लेदार भावूक झाले. एबी फॉर्म स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि भावनिक गोष्ट आहे. बऱ्याच वर्षांच्या निष्ठेची आणि कष्टाची ही पोचपावती मला मिळाली आहे. माझा कंठ दाटून आला असून मी राजसाहेबांचा ऋणी आहे.”
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू असून ३० डिसेंबर २०२५ ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील युतीमुळे यंदाची मुंबईची लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
