साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव।
गेल्या अनेक वर्षांपासून न्यू बीजे मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा सफाई झालेली नाही. पावसाचे पाणी काढण्यासाठी मार्केट बाहेर पंप आहे. मात्र, बऱ्याच वर्षांपासून तो नादुरुस्त पडलेल्या अवस्थेत आहे. वेळोवेळी असोशियशनद्वारे पत्र व्यवहार केले. मात्र, कोणताही उपयोग झालेला नाही. दरम्यान, एकीकडे अधिकारी मस्त तर दुसरीकडे व्यापारी त्रस्त असल्याची स्थिती आहे.
गेल्या आठवड्यापासून शहरात पावसाचे आगमन झाले आहे. अशातच शहरातील मध्यवर्ती ठिकाणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या न्यू बीजे मार्केटची पावसामुळे दुर्दशा झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. पावसामुळे न्यू बीजे मार्केटमधील दुकानांसमोर पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे खरेदी आणि विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. गटारीतील पाणीही दुकानांसमोर साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. भव्य उभारलेल्या न्यू बीजे मार्केटमधील गाळेधारकांनी स्वच्छतेच्या कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याची ओरड केली आहे. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
पावसाळा सुरु झाल्याने पावसाचे पाणीच पाणी न्यू बीजे मार्केटमधील तळाला असणाऱ्या दुकानांसमोर साचते. त्यामुळे नागरिकांना त्याठिकाणी चालणेही कठीण होते. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन साचलेल्या पाण्याचा निचरा काढण्यात यावा, अशी मागणीही तेथील व्यापाऱ्यांनी केली आहे.