फैजपूर नगर पालिकेच्या म्युनिसिपल हायस्कुची दयनीय अवस्था

0
28

वर्गांमध्ये साचले पाणीच पाणी, महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी दिली शाळेला भेट

साईमत/फैजपूर/प्रतिनिधी :

शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी सूचना अर्ज देऊनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींनी थेट महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांची भेट घेऊन म्युनिसिपल हायस्कुच्या दयनीय अवस्थेचा पाढाच वाचून समस्या सोडविण्याची गळ घातली आहे. वर्गांमध्ये साचले पाणीच पाणी, महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी शाळेला भेट दिली आहे.

येथील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या नगरपालिकेच्या मुन्सिपल हायस्कुलची ‘बाप भीक मागू देईना आणि आई जेवण देईना’ अशी अत्यंत दयनीय परिस्थिती झाली आहे. शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींना अनेक विषयांचे शिक्षकच उपलब्ध नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदार कोण…? विज्ञान विषयाच्या प्रयोग शाळेत प्रॅक्टिकलसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध असूनही प्रयोगशाळेची दयनीय अवस्था पाहता तेथे पावसाचे पाणी साचले आहे. वरील स्लॅबचे प्लास्टर पडून भगदाड पडण्याच्या तयारीत असल्याचे दृश्य दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या अंगावर प्लास्टर पडून काही दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण…? प्रयोगशाळेच्या अशा दयनीय अवस्थेमुळे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल होत नाही. पूर्ण इमारत जीर्ण झाली आहे. ठिकठिकाणी तडा गेलेल्या आहेत. शाळेत ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्याला जबाबदार कोण…? हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याची संतप्त भावना महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी व्यक्त केली.

नगरपालिकेला कायम स्वरुपी मुख्याधिकारी नाही

विद्यार्थी व पालकांचा उद्रेक होण्यापूर्वीच शासन, प्रशासनाने अशा गंभीर विषयाची दखल घ्यावी, असे त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून फैजपूर नगरपालिकेला कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रांत बबनराव काकडे यांच्याशी संवाद साधून अशा गंभीर विषयाकडे लक्ष देण्याचे सांगितले. इंग्रजी व काही विषयांचा एकही तास झाला नसल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नसल्याची गंभीर बाब समोर आली. शिक्षक पालक संघ, भारत मुक्ती मोर्चा यांनी प्रांत कार्यालय, शाळा प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिला आहे. यासंदर्भात तात्काळ समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here