१५१ पैकी १२० पर्यटकांशी झाला संपर्क
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागातील १५१ पर्यटक अडकले आहेत. अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन हे तातडीने उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत. आज सायंकाळी साडे चार वाजता ते देहरादून येथे दाखल होत आहेत.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अडकलेल्या १५१ पैकी १२० पर्यटकांशी संपर्क झालेला आहे. ते सुरक्षितस्थळी आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र हे उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष (डीईओसी उत्तरकाशी) तसेच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (एनईआरसी), नवी दिल्ली यांच्याशी सतत समन्वय साधून आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांनी आज अपर मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग) यांच्यासमवेत मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्र येथे परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आनंद बर्धन, मुख्य सचिव, उत्तराखंड यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांना आवश्यक ती तातडीची मदत करण्याबाबत विनंती केली. संचालक (आपत्ती व्यवस्थापन), उत्तराखंड यांच्याकडून महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार बचाव कार्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
बचाव कार्यासाठी उपग्रह फोन तैनात
एनईआरसीच्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले आहे.लष्कराच्या छोट्या सॉर्टींमार्फत स्थलांतर सुरू आहे. बचाव कार्यासाठी उत्तराखंडमध्ये उपग्रह फोन तैनात केले आहे. राजीव स्वरूप आयजीपी हे जबाबदार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पर्यटकांचे शेवटचे स्थान समजण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांना सूचित केले आहे. त्यांच्या मदतीने शोधकार्य सुलभ होईल. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र हे आवश्यक समन्वय साधून बचाव, मदत आणि कुटुंबियांना माहिती पुरविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.