भावाचा आक्रोश अन् तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
आपल्या भावासोबत पहिल्यांदाच पुण्याला नोकरीच्या शोधात निघालेल्या एका परप्रांतीय तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना १८ जून रोजी मोहाडी शिवारात रात्रीच्या सुमारास मोहाडी शिवारातील रेल्वे खांब क्रमांक ४०९ ते ४१० दरम्यान घडली. मयत तरुणाचे नाव राहुल साहब सरोज (वय २३, रा. शिकरारा, अलिशाहपूर, जौनपूर, उत्तर प्रदेश) असे आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
उत्तर प्रदेशातील शिकरारा गावात राहुल सरोज हा आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होता. त्याचा मोठा भाऊ गोपाळ पुण्यात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतो. कुटुंबाला आणि भावाला आर्थिक हातभार लागावा, अशा उद्देशाने राहुल पहिल्यांदाच भावासोबत रेल्वेने पुण्याला जात होता. १७ जून रोजी ते दोघे रेल्वेत बसले. १८ जून रोजी रात्री १० वाजता जळगाव येथून मुंबईकडे जात असताना राहुलचा धावत्या रेल्वेतून तोल गेला आणि तो खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
हृदय पिळवटून टाकणारा भावाचा आक्रोश
घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. त्याच रेल्वेत असलेला त्याचा भाऊ गोपाळला पुढे जाऊन या घटनेची माहिती मिळाली. तोही जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला. आपल्या भावाचा मृतदेह पाहून गोपाळने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.