साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर दहावीच्या विद्यार्थिनींना कार्यशाळेत मिळालेले मार्गदर्शन आत्मविश्वास वाढविणारे असणार आहे. अशा वेगवेगळ्या उपक्रमातून परीक्षेचे तंत्र अवगत होऊन विद्यार्थिनींना यशाची गुरुकिल्ली प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.श्याम पवार यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनींसाठी झालेल्या ‘परीक्षेला जाता जाता’ मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य गायत्री भदाणे होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विषय तज्ज्ञ उमेश मनोरे, ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, डी.बी.वाल्हे, जी.पी.हडपे, दीपककुमार पाटील, एन.बी.खंडारे, नीलिमा पाटील आदी उपस्थित होते.
प्राचार्य भदाणे म्हणाल्या की, विद्यार्थिनींच्या बौद्धिक क्षमतेला वाव देण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या मनातील परीक्षा विषयीची भीती दूर होऊन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाता येते. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थिनींसाठी चार दिवसीय कार्यशाळा आठ सत्रात पार पडली. कार्यशाळेत विद्यार्थिनींनी आपल्या मनातील अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे तर दीपक कुमार पाटील यांनी आभार मानले.
या विषय तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
कार्यशाळेत इंग्रजी विषयासाठी उमेश मनोरे (जानवे), मराठी विषयासाठी मुकेश पाटील (अमळनेर), हिंदी विषयासाठी दिलीप पाटील (अमळनेर), बीजगणित विषयासाठी मुकेश सोनकुसरे (कळमसरे), भूमिती विषयासाठी एस.ए.बाविस्कर (अमळनेर), विज्ञान विषयासाठी निरंजन पेंढारे (वावडे), इतिहास विषयासाठी विलास चौधरी (अमळनेर), भूगोल विषयासाठी ए.पी.चव्हाण (निम), उमेश काटे (अमळनेर) यांचे मार्गदर्शन लाभले. अनेक विषय तज्ज्ञ हे मॉडरेटर व पेपर तपासणीचा अनुभव असल्यामुळे बोर्ड परीक्षेत पेपर कसा सोडवावा, याविषयीचे विविध तंत्र समजावून सांगितले.