
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वृत्तपत्र पत्रकार बहुउद्देशीय संस्थेतर्फे तहसीलदारांना निवेदन
साईमत/लोहारा, ता.पाचोरा -/प्रतिनिधी : –
लोहारा परिसरातील लोहारा, म्हसास,कासमपुरा ,कळमसरा, कुऱ्हाड शिवारातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे अतिवृष्टी अनुदानाची रक्कम अत्यंत कमी प्रमाणात मिळाली तर अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाची रक्कम मिळाली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी पत्रकारांजवळ नाराजी बोलून दाखवल्याने लोहारा शहर वृत्तपत्र पत्रकार बहुउद्देशीय संस्थेने तहसीलदार पाचोरा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे बागायती शेती प्रमाणे अनुदान देण्यात यावे,अशा मागणीचे निवेदन दिले.
परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर शेततळे विहीर ठिबक व बोअर ची नोंद असताना बागायती शेती असून सुद्धा कोरडवाहू अनुदान मिळाले आहे. तरी शेजारील चाळीसगाव तालुक्यात बहुसंख्य शेतकऱ्यांना बागायती प्रमाणे अनुदान रक्कम मिळाली आहे. हे चुकीचे असून तहसीलदार पाचोरा यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिल्यावर कृषी विभाग व तलाठी यांनी बागायती शेती असताना कपाशीची जिरायत म्हणून पंचनामे केले. आधीच निसर्ग अतिवृष्टीने कोपला, त्यात चुकीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आल्याने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली तर अनेक शेतकरी आजही अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. तरी याबाबत पुनश्च दुरुस्ती पंचनामे करून वरिष्ठांकडे अहवाल पाठवावा.
तसेच मागील वर्षीचे अतिवृष्टी अनुदान व पिक विम्याची रक्कम आणि शेतकऱ्यांना मिळाले नाही. तरी कृषी विभाग व तलाठी यांनी चालू व मागील वर्षाची अनुदान प्राप्त व वंचित शेतकरी बांधवांच्या याद्या तलाठी काम विविध कार्यकारी सोसायटी ऑफिसमध्ये लावाव्यात. तसेच एकंदरीत परिस्थितीचा विचार करता बागायतीप्रमाणे अतिवृष्टी अनुदानाची रक्कम लोहारा व परिसरातील शेतकऱ्यांना मिळावी ही मागणी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने लोहारा शहर वृत्तपत्र पत्रकार बहुउद्देशीय संस्थेने तहसीलदार पाचोरा यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.
याबाबत तहसीलदार विजय बनसोडे यांचे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर तहसीलदार पाचोरा यांनी दखल घेत वरिष्ठांकडे पुनश्च अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले. यावेळी निवेदन देताना लोहारा शहर वृत्तपत्र पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दीपक पवार, उपाध्यक्ष दिलीप चौधरी ,ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके ,सचिव महेंद्र शेळके,रमेश शेळके, चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर राजपूत, उपसरपंच दिपक खरे उपस्थित होते.


