साईमत / अयोध्या
अयोध्या येथे शनिवारी शरयू नदीच्या तीरावर सुरू असलेल्या महायज्ञादरम्यान अचानक भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आगीच्या ज्वाळांनी काही क्षणांतच वेग घेत मंडप जळून खाक झाला. या घटनेमुळे उपस्थित भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.
या महायज्ञासाठी सुमारे ५० हजार भाविक उपस्थित होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, यज्ञात आहुती म्हणून अर्पण केलेला नारळ अचानक फुटल्याने ठिणगी पडून आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही क्षणांतच आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि संपूर्ण मंडप तिच्या भक्ष्यस्थानी पडला.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांच्या पुढाकारातून हा महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमस्थळ राम मंदिर परिसरापासून सुमारे ८०० मीटर अंतरावर होते. या सोहळ्यासाठी गोसाईगंजचे आमदार अभय सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या महायज्ञाचा शनिवारी समारोप होता. अंतिम दिवशी १,२५१ हवन कुंड उभारण्यात आले होते आणि सुमारे ५ हजार भाविकांनी मंत्रोच्चारासह आहुती दिली. घटना घडली तेव्हा मंडपात तुलनेने कमी गर्दी होती, कारण अनेक भाविक आधीच परतले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रशासनाने सांगितले.
