मध्यरात्रीला घडली घटना; ५० लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील शिवतीर्थ मैदानासमोरील समर एजन्सी नावाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भयानक होती की, संपूर्ण दुकानाच्या सर्व मजल्यांवर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत दुकानातील संपूर्ण कुलर, फ्रिजसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या असून प्राथमिक अंदाजानुसार जवळपास ५० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आगीची तीव्रता एवढी होती की, काही वेळातच ही आग संपूर्ण दुकानभर पसरली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. ही माहिती समजताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. अग्निशमन दलाच्या तब्बल आठ ते दहा बंबांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना तब्बल चार ते पाच तासांचा कालावधी लागला. अखेर ही आग पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. आगीला नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका, पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी मदत कार्यात सहभाग घेतला होता.
दुकान मालक सापडले संकटात
आगीत दुकानातील लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उत्पादने, विशेषतः नवीन कुलर, फ्रिज, पंखे, मिक्सर, ग्राइंडर आदी साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले होते. सुदैवाने, आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एवढ्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे समर एजन्सीचे मालक संकटात सापडले आहे.
मालकाची शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
आग लागण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. शहरातील दुकानांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानापासून बचावासाठी मदत होईल, याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, आगीची घटना घडल्यानंतर दुकान मालकाने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.