माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात — व्हॉट्सअॅपद्वारे जमा ६४ हजार
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
शहरातील भुसावळ रोडवरील अंबिका गॅरेजला ४ डिसेंबर रोजी रात्री उशिरा भीषण आग लागून संपूर्ण गॅरेज जळून खाक झाले. यात दुकानमालक भगवान रामदास निरखे यांचे अंदाजे २० ते २२ लाखांचे नुकसान झाले असून दहा वर्षांपासून उभा केलेला व्यवसाय क्षणात राख झाल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट झाले असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आहे.
आगीत गॅरेजमधील उपकरणे, साहित्य, सुटे पार्टसह सर्व मालमत्ता नष्ट झाले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या आठ युवकांचा रोजगारही या आगीत बाधित झाला असून व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी किमान पाच लाख रुपये लागणार असल्याचे दुकानमालकांनी सांगितले. आगीनंतर निरखे कुटुंब आर्थिक संकटात सापडले असतानाच त्यांच्या जुन्या मित्रपरिवाराने मदतीचा हात पुढे केला आहे.
इंदिराबाई ललवाणी शाळेच्या २००२ च्या दहावीच्या बॅचमधील सुमारे १७० विद्यार्थी निरखे यांच्या अडचणीत एकत्र आले. व्हॉट्सअॅप ग्रुपवर आग लागल्याची माहिती पोहोचताच सर्वांनी स्वयंस्फूर्तीने मदत करण्याचा निर्णय घेतला. रुपेश पाटील, विशाल इंगळे, योगेश चौरे आणि गजानन मडवे यांनी पुढाकार घेत माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. काही तासांतच ६४ हजार रुपये जमा करण्यात आले आणि ती रक्कम निरखे यांना सुपूर्द करण्यात आली.
डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि हातमजूर अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या बॅचच्या एकजुटीचे शहरात कौतुक होत आहे. कठीण प्रसंगी मित्रांनी धावून आल्याने व्यवसाय पुन्हा उभा करण्याचा आत्मविश्वास मिळाला, अशी प्रतिक्रिया भगवान निरखे यांनी दिली. तसेच अजूनही गॅरेज सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
