साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील वाघारी गावात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांसह पती आणि सासरच्या मंडळींविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, जामनेर तालुक्यात वाघारी येथे अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. मुलगी ही अल्पवयीन असतांनाही तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न २०२२ मध्ये त्यांच्या नात्यातील २२ वर्षीय तरूणासोबत लग्न लावून दिले. त्यानंतर पीडित मुलगी ही अल्पवयीन असतांना तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलगी व तिचे पती हे पुण्यातील कात्रज येथे राहण्यासाठी गेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. गर्भवती असल्याने तिला पुण्यातील भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पीडित ही अल्पवयीन असल्याचे समोर आले. याबाबत पुणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा जामनेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यात पीडित मुलीचे आई, वडील, पती, आत्या, मामा यांच्यासह सासरकडील मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करीत आहे.