शहर पोलिसात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
फळांचा व्यापार करण्यासाठी ‘माहेरून एक लाख रुपये घेऊन ये’, अशी मागणी करत शिवाजीनगरातील माहेरवाशीणीचा दमण गुजरात येथे सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी, १७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी आरफा नईम खान (वय २९, रा. शिवाजी नगर, हुडको) यांचा विवाह वापी (दमण, गुजरात) येथील नईम खान रहीम खान यांच्याशी झालेला आहे. लग्नानंतर ३१ मे २०१५ पासून ते २०२२ पर्यंत सासरी वापी येथे आणि त्यानंतर जळगाव येथे फिर्यादी वास्तव्यास असताना सासरच्या मंडळींनी त्यांना वेळोवेळी त्रास दिला. पती नईम खान याला फळांचा व्यवसाय करायचा असल्याने त्याने विवाहितेकडे यांच्याकडे माहेरून १ लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता.
ही मागणी पूर्ण न झाल्याने पती नईम खान, सासू समा खान, सासरे रहीम खान आणि नणंद नूरबानू अरबाज शेख यांनी संगणमत करून आरफा यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला.
सततच्या जाचाला कंटाळून अखेर आरफा खान यांनी १७ डिसेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी पती नईम खान, सासू समा खान, सासरे रहीम खान आणि नणंद नूरबानू (सर्व रा. वापी, गुजरात) यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलीस नाईक अश्विनी इंगळे करत आहेत.
