शवविच्छेदन करून मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात
साईमत/सोयगाव /प्रतिनिधी :
माहेरी आईकडे आलेल्या विवाहितेचा मृतदेह विहिरीत तरंगत असताना आढळून आल्याची घटना गलवाडा येथे गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोयगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शालिनी धर्मराज सुरवाडे (वय २८, रा.खांडवे, ता. जामनेर, जि. जळगाव) असे विहिरीत मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
सविस्तर असे की, विवाहिता सासरहुन माहेरी आली होती. बुधवारी पहाटे ती घरातून निघून बेपत्ता झाली होती. तिच्या आईने सोयगाव पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची नोंद बुधवारी केली. मात्र, त्या महिलेचा मृतदेह गुरुवारी सोनसवाडी शिवारात विहिरीत तरंगताना आढळून आला. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. विवाहितेवर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
विवाहितेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे, अजय कोळी, दिलीप पवार आदी करत आहे.