ताणतणावाचे वातावरण विसरून सर्वांनी लुटला आनंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या एप्रिल २०१९ मध्ये विशाल महाजन आणि नितीन नारखेडे यांनी मिशीगन लेवा समाजातील बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देश्यातून एक ग्रुप सुरू केला होता. त्यानंतर एकेक करत ७-८ परिवारांचा ग्रुप ५० परिवारांच्या ग्रुपमध्ये रुपांतरीत झाला आहे. नितीन नारखेडे, रवींद्र पाटील, विशाल महाजन, निखील जंगले, संध्या नारखेडे यांच्या नियोजनातून अभिजीत चौधरी, विजेंद्र पाटील, धीरज खर्चे, ललित नारखेडे, पियुष सावदेकर, भावेश चौधरी यांच्यासह अन्य क्रियाशील लेवा पाटीदार बांधवांच्या संयुक्त सहभागातून मिशीगनमधील लेवा समाजाचे द्वितीय संमेलन अमेरिकेतील मिशीगन राज्यातील ‘ब्लूम फिल्ड हिल्स’ याठिकाणी गेल्या रविवारी, ३ ऑगस्ट रोजी पार पडले. संमेलनाला वय वर्षे ७ महिनेपासून तर ७५ वर्ष वयापर्यंतच्या विविध वयोगटातील ६५ जणांनी हजेरी नोंदविली.
सकाळच्या नाश्त्याला मिसळ पाव आणि दुपारच्या जेवणात लेवा पाटलांचे प्रसिद्ध खाद्य पदार्थ भरीत पुरी, बिबडे, मठ्ठा आणि जिलेबी असा मेनू होता. दुपारी ऊन वाढल्यावर कलिंगड असा सर्व बेत होता. वांगी भाजण्यापासून तर भरीत बनविण्यापर्यंत, तर पुरी लाटणे, पुरी तळणे, मठ्ठा आणि बाकी सगळे पदार्थ करण्यात सर्व लेवा बांधवांनी उत्स्फूर्तपणे, स्वतः हून पुढाकार घेवून कामे केली. रोजच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणचे ताणतणावाचे वातावरण विसरून एक दिवस सर्वांनी फुल्ल आनंद लुटला.
‘जीटुजी’ अर्थात ‘गेट टुगेदर’ची विशेषता अशी की, प्रत्येक सदस्याने काही ना काही कामात सहभाग नोंदविला. यंगस्टर्सचा वाढता सहभाग आणि संमेलनात त्यांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता. परदेशात लेवा पाटील बांधव स्थलांतरित असले तरी ‘गेट टुगेदर’ ही एक पर्वणीच असते. त्यातून फक्त खाद्य संस्कृतीचाच नव्हे तर लेवा संस्कृतीचाही परदेशात विकास होतो. त्यात यंगस्टर्सचा आवर्जून सहभाग प्रशंसनीय ठरत आहे.
लेवा समाजाचे अस्तित्व परदेशातही टिकून
सातासमुद्रापारही लेवा संस्कृती समाज बांधव टिकवून आहे. ही बाब अभिमानास्पद ठरली आहे. अशा संमेलनांच्या माध्यमातून लेवा समाजाचे अस्तित्व परदेशातही टिकून आहे. तसेच समाजाची अस्मिता जपली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.