साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विजय नाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी कमांडट सुभेदार मेजर नागराज पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर श्रीराम पाटील, ज्येष्ठ शिक्षिका एस.पी.अहिरे होत्या. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षक डी. डी.घोडेस्वार, सांस्कृतिक विभाग प्रमुख शरद पाटील, संगणक शिक्षक व्ही. डी.पाटील होते.
सर्वप्रथम थोर साहित्यिक वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांनी केले. इयत्ता सहावीचे विद्यार्थी भूमित धनगर आणि नेहान माळी यांनी कविता सादर केल्या.त्यानंतर शरद पाटील यांनी मराठी भाषेतील गंमती जमती सांगितल्या. त्याचबरोबर वि. वा. शिरवाडकर यांची ‘कणा’ कविता त्यांनी सादर केली. डी.डी.घोडेस्वार यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषा व त्याचे महत्व सांगत वि.वा.शिरवाडकर यांनी २४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना मराठी भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगितले होते.
व्ही. डी.पाटील यांनी इंग्रजी भाषेचे प्रभुत्व वाढत असले तरी मराठी भाषेचा दर्जा कमी होता कामा नये, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात सुभेदार मेजर नागराज पाटील म्हणाले की, कोणतीही भाषा कमी दर्जाची नसते. एखाद्या भाषेचे संवर्धन करीत असतांना दुसऱ्या भाषेचा कधीच अनादर करू नये, असे सांगितले. यावेळी टी. के पावरा, वाय. के.भोई आदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले.