साईमत जळगाव प्रतिनिधी
मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारणी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी उपस्थित उद्योजक व्यावसायिक यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच जिल्हास्तरीय बांधणी करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा उद्योजक कक्षाचे विभागीय अध्यक्ष इंजि.विशाल देसले, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे,मराठा उद्योजक कक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील,उपाध्यक्ष जयंत पाटील,कार्याध्यक्ष भगवान शिंदे यावेळी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भगवान शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यात उद्योग व्यवसायिकांना मोठी संधी आहे.सर्व उद्योजक व्यावसायीक एकत्र आलो तर निश्चित सर्व स्तरावर प्रगती होईल असा आशावाद व्यक्त करत जळगाव जिल्ह्यात मराठा उद्योजक कक्ष करत असलेल्या कार्याचा आढावा दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी नवोदित उद्योजक आणि व्यावसायिक यांना विविध पातळीवर मदत केली जाणार असल्याचे सांगत आगामी काळात जळगाव जिल्ह्यात उद्योजक आणि व्यावसायिकांची मोठी मोट बांधली जाणार असून सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
यावेळी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख दीपक भदाणे यांनी नाशिक जिल्ह्यात उद्योग व्यावसायिकांना कौशल्य विकास, रेफरन्सेस,आणि उद्योग व्यवसायातील जगभरातील संधी यावर मार्गदर्शन केले जात असून त्याच धर्तीवर भविष्यात जळगाव येथे उपक्रम घेतले जातील असे सांगितले.
मराठा उद्योजक कक्षाचे विभागीय अध्यक्ष इंजि.विशाल देसले यांनी उद्योग व्यवसायिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते अशा काळात सर्वांनी एकत्र आल्यास यावर आपण मात करू शकतो असे सांगितले.तसेच त्यांनी नाशिकच्या धर्तीवर जळगाव आणि जळगावच्या प्रत्येक तालुक्यात साप्ताहिक बैठक घेण्याचे आवाहन केले.या बैठकींचा फायदा आणि त्यातून होणारी व्यावसायिक ग्रोथ याचे व्यवस्थित विवेचन केले. संपूर्ण टीमला मोटिव्हेट केले आणि भविष्यात त्यांच्या बरोबर असल्याचा विश्वास दिला.
जिल्हा कार्यकारिणी निवड मराठा उद्योजक कक्षाची जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, उपाध्यक्ष जयंत पाटील,कार्याध्यक्ष भगवान शिंदे यांनी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली यात जळगाव तालुकाध्यक्ष डॉ.ललित पाटील,यावल तालुका उपाध्यक्ष स्वप्निल बोरसे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पाटील,जिल्हा संघटक हेमकांत पाटील, महानगरप्रमुख पराग घोरपडे, चोपडा तालुका सचिव अधिकार सोनवणे,जामनेर तालुका अध्यक्ष संभाजी पाटील, भावेश पाटील,चोपडा तालुका संघटक सुदर्शन पाटील,मुकेश पवार यांची सर्वानी होते सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा विभागीय अध्यक्ष इंजि.विशाल देसले संपर्कप्रमुख दीपक भदाणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र,बुके,पुस्तक,देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत पाटील तर आभार डॉ.ललित पाटील यांनी मानले