साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर
महाराष्ट्रात वैभवशाली संपन्न सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडीचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. सूर्यकन्या तापी नदीचा असा भूसंपन्न परिसर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावरील चिंचोली गावाच्या उत्तरेला १० कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर आहे. चिंचोलीपासून ८ कि.मी.वर हनुमान मंदिर आहे. पुढे अवघ्या २ कि.मी. अंतरावर मनुदेवीचे मंदीर आहे. सातपुड्याला गतवैभव प्राप्त करुन देणारी देवी म्हणून तिचा उल्लेख होतो. नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
मंदिराचा इतिहास असा
श्री क्षेत्र मनुदेवीला गेल्यावर सुरुवातीला भाविकांच्या स्वागतासाठी उंच उंच वृक्ष टेकड्या पर्वत तसेच श्री रघुदेव (परशुराम) उभा आहे. मनुदेवीचे मंदिर प्राचीन आहे. उत्खननातून सापडलेल्या मूर्त्यांवरून ते दिसून येते. तीर्थक्षेत्राचा शोध इ.स.१५५१ ईश्वरसेन नावाच्या राजाच्या काळात लागला असे सांगितले जाते. ईश्वरसेन राजा राज्य करीत असताना त्याने हेमांडपंथी मंदिराची स्थापना केल्याचा उल्लेख आढळतो. मंदिराभोवती १३ फूट उंचीच्या विटा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बुरुजाचे काही भाग जरी ढासळलेले असले तरी सध्या अस्तित्वात असलेल्या अवशेषावरून पूर्वीच्या बांधकामाची रचना आणि मजबूतीचा अंदाज बांधता येतो. मंदिर परिसरात ४ ते ५ पाण्याच्या विहिरी आढळून येतात.
श्री क्षेत्र मनुदेवी ही खान्देश वासियांची कुलदैवत म्हणून ओळखली जाते. मनुदेवीच्या मंदिरापासून काही अंतरावरच मनुदेवीचे माहेर आहे. आज त्याठिकाणी आई-वडिलांच्या कोरीव मूर्त्या दिसून येतात. त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब आजही पडताना दिसून येतात. मंदिराच्या आवारात दगडी गोल गोटा आढळून येतो. त्याला ‘मनोकामना गोटा’ असे म्हणतात. गोटा दोन्ही हाताच्या अंगठ्याने स्तब्ध धरल्यावर उजवीकडे फिरल्यावर मनातून मागितलेली इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची भावना आहे. म्हणून खान्देशातून नव्हेच तर अख्ख्या महाराष्ट्रातून लोक याठिकाणी नवरात्र उत्सवात दर्शनासाठी गर्दी करतात.
असे होतात देवीचे यात्रोत्सव
नवरात्रीचे ९ दिवस, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी माघ आणि मार्गशीर्ष महिन्यात त्याचबरोबर चैत्र चावदस आदी दिवशी देवीचे यात्रोत्सव भरतात. मनुदेवीचे ठिकाण सातपुड्याच्या उंचीवर असल्याने चारही बाजूला उंच डोंगर आहे. जवळच ९० ते १०० फुटांवरुन कोसळणारा धबधबा आहे. तो भाविकांचे मन मोहून टाकतो. ६ ते ७ महिने कोसळणाऱ्या धबधब्याचे पाणी जवळच असणाऱ्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तलावात जमा होते. तलावाशेजारी हनुमान मंदिर आहे. आधी हनुमानाचे दर्शन घ्यावे लागते. मगच मनुदेवीचे दर्शन घ्यावे लागते. मंदिरापासून जवळच गवळी राजाने बांधलेल्या जुन्या गाय वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. तेथे काही वर्षांपूर्वी चुनघाना, वीटभट्ट्या आदी अवशेष दिसून येत होते. परंतु आज मात्र त्याठिकाणी हे अवशेष नामशेष झाले आहेत. तरीही काही भाविक व पर्यटक त्याठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. मंदिर बांधकाम व राजवाडा, गायवाडा बांधकाम करण्यासाठी लागणारी सर्व साधने जागेवरच तयार करण्यात येत असत. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवीच्या नवरात्रोत्सवाला यंदा १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. यंदा सप्तमी व अष्टमीला शनिवार आणि रविवारचा सुट्टीचा योगायोग आल्याने दोन दिवस मनुदेवीच्या चरणी लाखो भाविकांनी उपस्थिती दिली. त्यामुळे प्रशासनालाही खबरदारी व उपाययोजना करावी लागली. तसेच श्री क्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठानलाही परिश्रम घ्यावे लागले.
नवरात्रोत्सवासाठी पदाधिकारी घेताहेत परिश्रम
नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सुविधेकरीता मनुदेवी मंदिराच्या सभागृहात यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. फैजपूरचे विभागीय पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. नवरात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी यावलचे पो.नि.राकेश मानगावकर, यावल बस आगाराचे वाहतूक नियंत्रक विकास करांडे, वनविभागाचे वनपाल विपुल पाटील, सा.बां.वि.चे अधिकारी, प्राथमिक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सर्व विभागाचे कर्मचारी, आडगावचे सरपंच आमिना रसीद तडवी, तलाठी आर.के.गोरटे, पोलीस पाटील संघटनेचे अशोक पाटील, परिसरातील पोलीस पाटील तसेच मनुदेवीचे संस्थाध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी, खजिनदार सोपान वाणी, विश्वस्त सतीश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, चिंधु महाजन, भूषण चौधरी, योगेश पाटील, चंदन वाणी, नितीन पाटील, विश्वस्तासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.