साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे-पाटील सोमवारी, ४ डिसेंबरला विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूरात येत आहेत. त्या अनुषंगाने सकल मराठा समाजाची नियोजन बैठक बुलढाणा रस्त्यावरील जनसंपर्क कार्यालयात नुकतीच पार पडली. बैठकीत जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त नियोजित कार्यक्रमावर चर्चा झाली.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यांवरुन मनोज जरांगे-पाटील संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी, ४ डिसेंबरला मलकापूरात दाखल होत आहेत. येथील सकल मराठा समाजाच्यावतीने जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन केली आहेत. त्याच धर्तीवर त्यांच्या दौऱ्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. ४ ला मनोज जरांगे-पाटील मुक्ताईनगरवरुन मलकापूरात दाखल होतील. जग्गू मामा धाब्यावर त्यांचे स्वागत सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात येईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी नगरात जेसीबीने फुलांची उधळण केली जाईल. शिवपुतळ्यास मानवंदना दिल्या नंतर सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने मनोज जरांगे-पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
मुक्ताईनगर रस्त्यावरील चारखंबा चौक, पंचायत समितीमार्गे मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाज पथसंचलन करीत तहसील चौकात दाखल होईल. पुढे हनुमान चौक पुन्हा परत तहसील चौकात आल्यानंतर नांदुरा रस्त्यावरून पुढे बाजार समिती, यशवंत नगर, रामवाडी व जाधववाडी येथील नागरिकांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
दरम्यान, अनुराबादेतील जिजाऊ मंडळांच्या सदस्या चिमुकल्या मुली टाळ व मृदंगाच्या निनादात मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथसंचलनाचे नेतृत्व करतील. त्यांच्या जोडीला सकल मराठा समाजाच्या महिला भगिनींचा सहभाग राहील. पुढे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाखाली मनोज जरांगे-पाटील यांच्या जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले. त्याठिकाणी सकल मराठा समाजाला संबोधित करुन त्यांचे खामगावकडे प्रस्थान होणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सकल मराठा समाजाच्या आयोजित नियोजन बैठकीत केले आहे. त्या अनुषंगाने पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.