प्रदीर्घ ३२ वर्षांचा सेवाकाळ पूर्ण, अनेकांकडून सपत्नीक सत्कार
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
येथील सुखसागर बहुउद्देशीय सभागृहात तालुक्यातील करगाव आश्रमशाळेतून ३२ वर्षांचा प्रदीर्घ सेवाकाळ पूर्ण करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक कवी मनोहर आंधळे यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. अध्यस्थानी चाळीसगाव मसापचे संस्थापक-अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप होते. याप्रसंगी मसाप शाखेचे कार्यकारी विश्वस्त तथा ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, कवी प्रा. वा. ना. आंधळे, ॲड. प्रशांत पालवे, सेवा सहकारी शि. प्र. मंडळाचे उपाध्यक्ष तथा चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र राठोड, सेवा सहकारीचे चिटणीस राजेश राठोड, संचालक योगेश चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर बागुल तसेच सत्कारमूर्ती कवी मनोहर आंधळे, उर्मिला आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगतात प्राचार्य जगताप यांनी मुख्याध्यापक मनोहर आंधळे मसाप कार्याध्यक्षपदासही गेल्या ५ वर्षांपासून उल्लेखनीय न्याय देत असल्याचे समाधान व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकरांनीही मुख्याध्यापक कवी-मनोहर आंधळे यांच्या आदर्श शिक्षकी व्यक्तिमत्वाचा गौरव केला तर सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस राजेश राठोड यांनी आपण शासन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेले मुख्याध्यापक कवी मनोहर आंधळेंसारख्या बहुआयामी अध्यापकाच्या शैक्षणिक अध्यापनासह शालेय प्रशासनास मुकणार असल्याची खंत व्यक्त केली. त्यासोबतच आंधळे परिवाराचे नातलग डॉ. अनुपम वाघ, कमलेश डोमाडे, मित्र प्रा. वाघमारे यांनीही मनोगते व्यक्त केली.
संस्थेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सेवापूर्ती मानपत्राचे लेखन, वाचन सेवानिवृत्त प्राचार्य राजाराम उगले यांनी केले.
चित्रकाराने रेखाटलेले तैलचित्र मान्यवरांच्या हस्ते दिले भेट
याप्रसंगी सत्कारमूर्ती कवी मनोहर आंधळेंचे चित्रकार प्रा. एस. के. मोरे यांनी तैलचित्र रेखाटून मान्यवरांच्या हस्ते भेट म्हणून दिले. कार्यक्रमाला कवी आंधळे यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, शास्त्रीनगर रहिवासी, नागरिक, सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आश्रमशाळा, करगाव, पिंपरखेडतांडा, राजदेहरे, शिंदी, परतूर, जि. जालना येथील आश्रमशाळांचे कार्यरत, सेवानिवृत्त प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक मनोहर आंधळेंचे एरंडोल येथील ज्येष्ठ बंधू कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी केले. सूत्रसंचालन वंदना रोकडे तर आभार सौरभ आंधळे यांनी मानले.



