मंगळग्रह मंदिराने ध्वजारोहण प्रसंगी दिला सर्वधर्म समभावाचा संदेश

0
23

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी

हम सब एक हैं…! हम सारे कौन है ? भारत का सपूत हैं…!! अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वधर्मीयांकडून घोषणाबाजी झाली ती सामाजिक जाणिवेचे नेहमीच उचित भान असलेले अर्थात मंगळग्रह मंदिर येथे.
१३ ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे सर्वधर्मीय समाज बंधू-भगिनींना एकत्र करून मंदिराच्या प्रांगणात सामूहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. सर्वधर्मीयांत हिंदू, मुस्लीम, शीख, जैन, गुजराथी, सिंधी, बौद्ध, माहेश्वरी, अग्रवाल, पारशी ,बोहरी आदींचा समावेश होता. सर्वांनी एकत्रितपणे ध्वजारोहण केल्यानंतर एका तालात व सुरात राष्ट्रगीत म्हटले. भारताची एकता, अखंडता, राष्ट्रवाद व समृद्धी निरंतर वृद्धिंगत व्हावी, यासाठी सर्वांनी आपापल्या धर्मप्रथेप्रमाणे प्रार्थनाही केली. भारतमातेच्या जयघोषासह एकता व अखंडतेच्या घोषणाही दिल्या. मंदिराचे सुरक्षासेवक असलेल्या भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांनी खड्या आवाजात राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ५४ फुटी खांब्यावर चार बाय आठ चा डौलाने फडकणारा तिरंगा सर्वांचेच आकर्षण ठरला.

सर्वधर्मीयांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींमध्ये जितेंद्र अग्रवाल, अमरीश अग्रवाल, प्रशांत सिंघवी, प्रसन्न पारख, योगेश मुंदडे, पंकज मुंदडे, शब्बीर पैलवान, ॲड. शकील काझी, चेलाराम सैनानी, भरत ललवाणी, संध्या शाह, प्रा. डॉ. जयेश गुजराथी, प्रीतपालसिंग बग्गा, बौद्धाचार्य बापूराव संदानशिव, ताहा बुकवाला, एजदी भरूचा, मकसूद बोहरी आदींचा समावेश होता.

यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी ध्वजपूजन केले. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, जयश्री साबे, सेवेकरी आर. जे. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, ए. डी. भदाणे, एम. जी. पाटील, जी. एच. चौधरी, प्राजक्ता पाटील तसेच मंदिराचे सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.जयेंद्र वैद्य व अक्षय जोशी यांनी पौरहित्य केले एस. पी. वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

दरम्यान, एका धर्मस्थळाच्या माध्यमातून जातीय सलोखा वृद्धिंगत करणारा ,सहसा कोठेही न राबविला गेलेला , अत्यंत आगळा – वेगळा राष्ट्रीय उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी मंगळग्रह सेवा संस्थेचे कौतुक केले. तसेच मंदिर परिसरातील स्वच्छता, हिरवळ, रोपवाटिका, सेंद्रिय खतनिर्मिती आदींबाबत समाधान व्यक्त केले. संपूर्ण मंदिर परिसरामध्ये तिरंगे झेंडे लावून तथा मंदिराला भगवा ,पांढरा व हिरव्या रंगाच्या फुग्यांनी व वस्त्रांनी सजवून आगळीवेगळी वातावरण निर्मिती करण्याचाही यावेळी संस्थेने प्रयत्न केला. त्याचीही सर्वांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here