खंडोबाची आरती तळी भरून जल्लोषात
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील तमाम गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून यावर्षी महाराष्ट्रातील ६५ गडकोटांवर गड पूजन करून दसरा साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमाअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगड येथे सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या दुर्गसेवकांनी मल्हारगड येथे दसरा साजरा केला. त्यात गड पूजन शस्त्र पूजन तसेच गडदेवता खंडोबाची आरती व तळी भरून मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत दसरा महोत्सव साजरा केला.
सर्वप्रथम सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी गडावरील हनुमान टेकडी येथे छत्रपती शिवरायांच्या पालखीची पूजा केली. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. वाजत-गाजत पालखी मिरवणूक गडावरील पुरातन पायऱ्या ज्या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या होत्या, त्या सह्याद्री प्रतिष्ठानने मातीचा ढिगारा बाजूला करून काढल्या आहेत. याठिकाणी आली.
येथे भंडारा व फुलांनी सजविलेल्या पायऱ्यांची पूजा करून गड पूजा करण्यात आली. कु.चेतना भागवत हिने छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयजयकाराची गारद दिली. त्यानंतर मल्हारगड देवता खंडोबाची आरती यावर्षीचे महोत्सवातील भोजन व्यवस्थेचे मानकरी आर.के.माळी, बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली.
उपस्थित सर्व दुर्गसेवकांनी खंडोबा भक्त गोंधळींच्या हाताने देवाची विधिवत तळी भरून मल्हारगड दसरा महोत्सव पूर्ण केला.कार्यक्रमाला चाळीसगाव शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक, दुर्गसेविका सहपरिवार उपस्थित होते.