राज्यपालांच्या हस्ते मंत्र्याच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान
साईमत/पारोळा/प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन कृषी विभागाने नव्याने सुरू केलेल्या “युवा शेतकरी पुरस्काराचा” नाशिक विभागातून पहिलाच पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मल्हार कुंभार या युवा शेतकऱ्यास मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार नुकताच देण्यात आला.
आपल्या शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून यश संपादित केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत नुकताच मुंबई येथे पार पडला.
या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड या गावातील कृषी पदवीधर असलेले तरुण शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांना शासनाने नव्यानेच सुरू केलेल्या युवा शेतकरी हा पहिलाच नाशिक विभागातून पहिलाच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपल्या शेती राबवलेल्या विविध घटक व कृषी संलग्न व्यवसायातून साधलेली प्रगतीची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली होती.
मल्हार कुंभार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार उमेश पाटील, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील, सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कुर्बान तडवी, प्रकल्प उपसंचालक दादाराव जाधववार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी स्वागत केले.