साईमत, जामनेर : प्रतिनिधी
ओबीसींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपला लढा सुरू आहे. त्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने भुसावळला येत्या शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी ओबीसी आरक्षण स्वसंरक्षण अधिकार महामेळावा होत आहे. हा महामेळावा यशस्वी करा, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस जे.पी.सपकाळे यांनी केले. जामनेर येथील माळी समाज मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसींचे हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांना एकत्रित करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने उत्तर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावे घेण्यात येत आहे. हे महामेळावे यशस्वी करा, असे आवाहन श्री.सपकाळे यांनी केले.
ओबीसी समाजातील सर्व जाती समुदायांना एकत्रित करून होऊ घातलेल्या २१ तारखेच्या अधिकार मेळाव्यात सहभागी करून घ्या, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि समता सैनिकांना केले. याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष प्रा.उत्तम पवार यांनीही मार्गदर्शन करून जामनेरमधून जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव येणार असल्याचे मनोगत व्यक्त करत मेळावे यशस्वी करण्याचा निर्धार केला.
यावेळी तालुका कार्याध्यक्ष पवन माळी, तालुकाध्यक्ष नरेश महाजन, शहराध्यक्ष विनोद माळी, समाज ट्रस्टी मुकुंदा माळी, बळीराम चौधरी, माजी सैनिक योगेश झाल्टे, पी.एल.महाजन, गणेश झाल्टे, गणेश माळी, प्रभु झाल्टे, महेंद्र माळी, बबलू महाजन, गोकुळ माळी, युवराज माळी, दीपक माळी, दत्ता नेरकर, राजू महाजन, सुरेश माळी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.