साईमत, नवापूर : प्रतिनिधी
तालुक्यात शेती पंपासाठी वीज पुरवठा नियमित व सुरळीत करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसतर्फे १ सप्टेंबर २०२३ पूर्वी तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले होते. वीज महावितरण कंपनीने नवापूर तालुक्यात नियमित वीज पुरवठा करावा, अन्यथा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जवाबदार राहील, असे निवेदनात म्हटले होते.
मागील एक महिन्यापासून नवापूर तालुक्यात शेती पंपासाठी केला जाणारा वीज पुरवठा हा अनियमित करण्यात येत आहे. त्यामुळे नवापूर तालुक्यातील शेतकरी हैराण झालेला आहे. मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारलेली असतांना विजेचा लपंडाव शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यात पाऊस नाही आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी शेतीला पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे पिके करपली आहे. तसेच अचानक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता तसेच वेळापत्रक जाहीर न करता वीज महावितरण कंपनीने अनियमीत लोडशेडींग सुरु केले आहे. त्यामुळे शेतकरी वीज बिले भरुनही आपल्या शेतीला पाणी देऊ शकत नाही. नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परीस्थीती निर्माण झालेली असतांना वीज महावितरण कंपनी ही शेतकऱ्यांना अनियमित वीज पुरवठा व लोड शेडींगमुळे शेती पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे नवापूर तालुक्यात शेती पंपासाठी केला जाणारा वीजपुरवठा हा ८ तास नियमित करण्यात यावा. तसेच घरगुती वापरासाठी पुरवठा करण्यात येणारा ही वीजपुरवठाही नेहमी अचानक लोडशेडींग होत असल्याने घरगुती विजेचे ग्राहक त्रस्त झालेले आहे. विद्युत वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आलेली असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
अखेर आमदारांच्या उपस्थितीत बैठक
त्या अनुषंगाने बुधवारी, ६ सप्टेंबर रोजी नवापूर तालुक्याचे आ. शिरीषकुमार नाईक, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी.गावित यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांच्या दालनात नवापूर तालुक्यातील वीज उपअभियंता यांच्याशी बैठक आयोजित केली होती. बैठकीत नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, पं.स.सदस्य राजेश गावित, तालुकाध्यक्ष जालमसिंग गावित, माजी नगराध्यक्ष दामुआण्णा बिऱ्हाडे, शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया, सरपंच जयंत पाडवी, दिलीप पवार, जयेस गावित, दिलीप गावित, आनंद गावित, दासु गावित, किसन गावित यांच्यासह काँग्रेसचे पदधिकारी, शेतकरी वर्ग उपस्थित होते. यावेळी वीज अभियंता व्ही.एन.चव्हाण, विलास गुरव, रामनवगेशवर दोरकर यांनी सांगितले की, नवापूर तालुक्यातील फिडरनुसार विजेचा लोड बघुन शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगितले.
..अन्यथा वीज कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा
दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांचा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जवाबदार राहील, असा इशारा आ.शिरीषकुमार नाईक यांनी दिला आहे. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.