महाबळ कॉलनी पोलीस चौकीजवळील रोडवर उभी केली होती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, चोरट्यांनी पोलीस चौकीजवळील परिसरालाच लक्ष्य केले आहे. महाबळ कॉलनी पोलीस चौकीच्या अगदी जवळील रोडवरून चोरट्यांनी २ लाख ७० हजार रुपये किमतीची पांढरी ‘महिंद्रा मॅक्सिमो’ मिनी व्हॅन लंपास केली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी तुषार उदय वाणी (वय २८, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी आपली मॅक्सिमो मिनी व्हॅन (क्र. MH 04 GE 5669) नेहमीप्रमाणे महाबळ कॉलनी पोलीस चौकीजवळील रोडवर उभी केली होती. ३ फेब्रुवारीच्या रात्री सुमारे ६ वाजेच्या सुमारास ही गाडी चोरीला गेल्याची शक्यता आहे.
गाडी हरवल्याचे लक्षात येताच तुषार वाणी यांनी परिसरात शोध घेतला, पण गाडी मिळून आली नाही. अखेर त्यांनी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ७:०३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या चोरीमुळे तुषार वाणी यांचे अंदाजे २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहेत.पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत आणि चोरीची माहिती मिळाल्यास तातडीने संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्यास सांगितले आहे.
