महिला मंडळ शाळेत माय मराठी झाली अभिजात भाषा निर्णयाचे स्वागत

0
93

विविध सुविचारांसह अभिनंदनाच्या घोषणांचे तयार केले होते फलक

साईमत/चोपडा/प्रतिनिधी

‘माझ्या मऱ्हाटीचे बोलु कौतुके, अमृतातेही पैजा जिंके’, अशी थोरवी असणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गेल्या अनेक वर्षापासून असलेली मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर करत सकल मराठी मनांना आनंद दिला आहे. भारत सरकारच्या निर्णयाचे येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आले.

विद्यालयातील शिक्षक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे प्रमुख कार्यवाह संजय बारी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून झालेले विविध स्तरावरील प्रयत्न, हा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेचा गौरव कसा वाढेल, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माय मराठी महाराष्ट्र शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी मराठी आणि इतर बोलीभाषा यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करता येतील, असे सांगत मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास सांगितला. माय मराठी महाराष्ट्र संघाचे राज्य उपाध्यक्ष विलास पाटील (सेवा निवृत्त मुख्याध्यापक) यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची थोरवी सांगत मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी उपस्थित होत्या.

यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील विविध सुविचारांचे तसेच अभिनंदनाच्या घोषणांचे फलक तयार केले होते. कलाशिक्षक तथा पर्यवेक्षक विजय पाटील यांनी आकर्षक फलक लेखन केले होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून गेली तीन वर्षे सातत्याने राष्ट्रपतींना विनंती करणारी पत्रे लिहिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here